॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

ऐतिहासिक वारसा
विलेपार्ले हे मुंबईतील एक सुप्रसिद्ध पुण्याप्रमाणेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक वारसा जपणारे एक महत्वाचे पश्चिम उपनगर. अनेक बुद्धिमान, हरहुन्नरी, कलाकार, धनवान व्यक्तींच्या वास्तव्याने समृद्ध झालेले एक सुसंस्कृत उपनगर. स्वातंत्र्याआधीच इथे पार्ले टिळक विद्यालय, लोकमान्य सेवा संघ यासारख्या संस्थांचे जाळे विणायला सुरवात झाली होती. पण विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या काही तरुण मंडळीनी समाजाभिमुख राहून कार्य करण्याचा निश्चय केला. संस्थेचे नाव ठरले “अुत्कर्ष मंडळ विलेपारले” आणि बोधवाक्य ठरले भगवदगीतेतील वचन “उद्धरेत् आत्मना आत्मानम्” अर्थात “स्वतः स्वतःचा उद्धार करावा”.
संस्था स्थापनेचा निश्चय तर झाला. त्यांनी अंगिकारलेल्या तत्त्वांनुसार, विचारानुसार ६ डिसेंबर १९६४ रोजी संस्थेची मुहूर्तमेढ रचली, पण जागा? मग संस्थापक श्रीमती सुधाताई चितळे यांच्या ओळखीतून आज जिथे वास्तू उभी आहे, ती जागा मिळाली. त्यासाठी नाटकाचे प्रयोग करण्यापासून, दानदात्यांकडे झोळी पसरण्यापर्यंत, अगदी घराघरातील रद्दी गोळा करण्यापर्यंत निकराचे, अतोनात आणि अथक प्रयत्न सगळ्याच समविचारी कार्यकर्त्यांनी केले.
१९८३ पासून इमारतीच्या कामाला सुरुवात झाली आणि वेगाने काम पूर्ण करीत २३.०३.१९८५ रोजी वास्तूत प्रवेश करता आला. या कार्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यातील बरीच मंडळी काळाच्या पडद्याआड गेली आहेत किंवा वयानुसार कामातून निवृत्त झाली आहेत. संस्थेचे संस्थापक सचिव श्री. अशोक सीताराम जोशी यांचे बोल आपण प्रत्यक्ष ऐकू शकतो. आज संस्थेने ५६ वर्षे पूर्ण केली आहेत.
रक्तदान शिबिरे, फोटोग्राफी वर्ग, बुद्धिबळ वर्ग, पुस्तक पेढी, रायफल शूटिंग अशा अनेक उपक्रमातून तरुण वर्गाला आकर्षित, प्रेरित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. (या सर्वापेक्षाही मोठा आणि महत्वाचा उपक्रम म्हणजे “स्व. सौ. उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय.” श्रीमती अनघा करंदीकर यांच्या घरी खाजगी स्वरुपात चालणाऱ्या शाळेची जबाबदारी १९८२ पासून आपण स्वीकारली. प्रयत्नपूर्वक तिला सरकारमान्यता मिळविली आणि आज ३७ वर्षे ही शाळा उत्तम रीतीने दिव्यांग मुलांच्या (मूक-बधिर) शिक्षणाची काळजी घेत आहे.)
संस्थेने २०१४ रोजी सुवर्णमहोत्सव साजरा केला. या सर्व ५५-५६ वर्षात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी वृत्तीचे स्वयंसेवक, डॉक्टर्स, यांनी संस्थेच्या उत्कर्षासाठी मनापासून आणि बहुमूल्य योगदान दिले आहे. संस्था त्या सर्वांचीच ऋणी आहे पण विशेषकरून उल्लेख करावा लागेल तो श्री. यशवंत देवस्थळी यांचा कारण शाळेच्या आधुनिक रचनेसाठी त्यांनी भरघोस रक्कम दान केली. आणि टेक महिंद्र फाउंडेशन या संस्थेचा. गेली पाच वर्षे ही संस्था आमच्याबरोबर संलग्न असून विद्यालयाच्या प्रगतीमध्ये, नवविचारांच्या समावेशात त्यांचा बराच मोठा वाटा आहे. शाळेच्या शैक्षणिक निकालांचा आलेख चांगला आहेच पण राष्ट्रीय पातळीवरील सायन्स प्रदर्शनात आणि नाट्य अभियानाच्या क्षेत्रात आपल्या मुलांनी स्पृहणीय यश मिळविले आहे. संस्थेची जागा मर्यादित असतानाही आज संस्थेत फिजिओथेरपी केंद्र (श्री. वसंत खरे यांच्या दानातून उभे राहिले) अल्प किंमतीत लोकांना सेवा उपलब्ध करून देत आहे. योग शिक्षण, नृत्यकला, गायनकला, सितारवादन , अभ्यासिका यासारखे उपयोगी आणि आनंददायी उपक्रम मंडळात चालू आहेतच.
आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे १९९४ पासून सुरू असलेला “ग्रंथगौरव पुरस्कार” संस्थापक. श्री. अशोक सीताराम जोशी यांनी दिलेल्या देणगीतून दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथापैकी एका उत्कृष्ट ग्रंथाला हा पुरस्कार “डॉ. केशव बळीराम हेडगेवार” यांच्या नावाने दिला जातो. आज २५ वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. या निमित्ताने प्रथितयश लेखक आणि वक्ते यांनी श्रोत्यांना उच्च प्रतीचा आनंद दिला आहे.
संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापासून समाजसेवा करणाऱ्या एका व्यक्तीचा दरवर्षी ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाव्रती” पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. तसेच समाजसेवा करणाऱ्या समतोल फाऊंडेशन, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, नाना पालकर स्मृती समिती, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान या संस्थांना अर्थसहाय्य केले आहे. वाडा जिल्ह्यातील येथील “माडाचा पाडा” या गावात ठिबक सिंचन योजनेतही योगदान दिले आहे.
यावर्षी टेक महिंद्र आणि ब्राईट फ्युचर आणि अुत्कर्ष मंडळ विलेपारले या त्रिवेणी संगमातून शिक्षणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत. त्यांना बँक किंवा तत्सम संस्थात काम करण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्ये वाढविणे यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला जातो.
हे सर्व करतानाच आगामी ध्येय आणि बदलही विचाराधीन आहेत. वास्तूच्या इमारतीचे नूतनीकरण, शाळेसाठी प्रशस्त जागा असे प्रश्न आहेतच. त्यावर उत्तरे शोधायची आहेत आणि त्यासाठी समाजातील तरुण वर्गाचे सहाय्य आणि योगदान यांची अपेक्षा आहे. तसेच ज्यांना शारीरिक योगदान देणे शक्य नसेल तर त्यांनी आपली कल्पकता, बुद्धिमत्ता, वेळ आणि धन यामार्फत मंडळाला आणखीन उंच शिखरे गाठण्यात मदत करावी अशी नम्र अपेक्षा आणि विनंती आहे.
संस्थेची ध्येये आणि उद्दिष्टे
२. बालवाडी, युवा वर्ग, महिला मंडळ, आरोग्य शिबिरं, साक्षरता अभियान, व्याख्यानमाला, परिसंवाद, विविध स्पर्धा, चित्रपट महोत्सव, विविध कलांची रसग्रहण शिबिरं, ह्यातून समाजमनाची मशागत करतानाच, जिम्नॅस्टिक, शारीरिक प्रशिक्षण वर्ग, आणि विविध खेळांचं प्रशिक्षण आणि त्यांच्या स्पर्धातून मनोबलाच्या सोबतच समाजाचं शारीरिक बल वाढवणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. पण हे करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात उत्तेजना मिळावी, त्यांच्या हुशारीचा योग्य तो गौरव व्हावा ह्यासाठी विविध बक्षिसं आणि शिष्यवृत्त्या देणे, इत्यादी संस्थेची उद्दिष्टे आहेत.
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)