॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥
स्व. सौ. उषा जामनेरकर मूकध्वनि विद्यालय
आयुष्यात काही घटना आपण नियोजन करून, विचारपूर्वक घडवून आणतो पण काही घटना कदाचित नियतीच आपल्यासाठी ठरवीत असते. जी गोष्ट व्यक्तीच्या आयुष्यात तीच संस्थेच्याही बाबतीत घडू शकते.
अुत्कर्ष मंडळाच्या “मूकध्वनी” विद्यालयच्या संदर्भात काहीसे असेच नियतीचे योगदान आहे. अंधेरीला, स्वतःच्या घरात, एका ध्येयाने प्रेरित होऊन श्रीमती अनघा करंदीकर या, मूकबधिर मुलांसाठी १९७२ पासून शाळा चालवत होत्या पण मुख्यत: आर्थिक अडचणींमुळे त्यांना काही काळाने ही शाळा चालविणे अवघड होऊ लागले त्यांनी अुत्कर्ष मंडळाशी संपर्क केला आणि स्वतःची इमारतही नसलेल्या मंडळाने, हे कार्य हातात घेऊन १९८२ पासून शाळा चालवायला घेतली. या मोठ्या निर्णयानंतर सभासदांना स्वतःच्या इमारतीची निकड जाणवू लागली आणि १९८३ ते १९८५ या दोन वर्षांत अथक प्रयत्नांनी श्री. दिवेकर यांच्याकडून विकत घेतलेल्या जागेवर आजची वास्तू उभी राहिली आणि १९८५ पासून शाळा मंडळाच्या इमारतीत भरू लागली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक समाजकल्याण खात्याकडून अनुदान मिळवले आणि आज ७५ विद्यार्थी घेण्याची कायमस्वरूपी मान्यता असलेली शाळा ३८ वर्षे उत्तम रीतीने दिव्यांग मुलांसाठी काम करीत समाजऋण फेडीत आहे.
श्रवणयंत्रे प्रदान योजना, पूरक आहार योजना, शैक्षणिक साहित्य योजना, क्रीडा प्रशिक्षण उपक्रम, शैक्षणिक शिबिरे, वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक सहली अशा विविध योजना आणि उपक्रम यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जातो.
यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना खालील प्रमाणे:-
पूर्व प्राथमिक इयत्ता सातवी पर्यंत मराठी आणि हिंदी माध्यमातून वर्षे अडीच ते १८ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातर्फे लागू असलेले नियमित शिक्षण विनामूल्य दिले जाते. २००६ पासून २०१८ पर्यंत ७० ते ७५ विद्यार्थी दहावीच्या शालांन्त परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि प्रत्येक वेळी शाळेचा निकाल १००% लागला आहे.
इ. स. २००६ मध्ये ५२ विद्यार्थी आणि १७ शिक्षक कर्मचारी यांची सिमला कुलु-मनाली कुरुक्षेत्र, चंदीगड व दिल्लीची सहल. संसद भवन व राष्ट्रपती भवनाला दिलेली महत्त्वपूर्ण भेट, राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बरोबर दीड तास साधलेला संवाद विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही भेट घेतली आणि सर्वांनाच एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली.
२०१२-१३ नंतर गणित संबोध परीक्षेत विद्यार्थी यश मिळवीत आहेत. त्याच वर्षापासून “संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान” तर्फे घेण्यात येणाऱ्या “रामायण” “महाभारत” यावर आधारित परीक्षांमध्येही विद्यार्थी यश मिळवीत आहेत.
४ जानेवारी २०१४ रोजी केशवसृष्टी-उत्तन येथे सूर्यकुभं ऊर्जा “स्वावलंबन की ओर” या कार्यशाळेत ३५०० सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर कर्णबधिर विद्यार्थ्यांची अशी आपली एकमेव शाळा सहभागी झाली होती.
या कार्यक्रमात आमच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेतून राष्ट्रगीत सादर केले. “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली आहे.
२५ हून अधिक वर्षे पार्ले येथील सुप्रसिद्ध बालतज्ञ डॉ. शशिकांत वैद्य सातत्याने आमच्या मुलांच्या आरोग्याविषयी तपासण्या आणि मार्गदर्शन करीत आहेत.
२०१२ पासून “जोश” या स्मिता विजयकर यांच्या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देण्यात येते.
१९९९ मध्ये श्री. मलकानी आणि २०११ मध्ये श्री. यशवंत मोरेश्वर देवस्थळी यांनी उदारहस्ते दिलेल्या देणगीतून विद्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या उन्नयनासाठी,आणि पालकांच्या प्रबोधनासाठी दरवर्षी कार्यशाळा घेण्यात येतात.
विशेष जिल्हा समाजकल्याण कार्यालय मुंबई उपनगर जिल्हा यांचे तर्फे २००५ पासून दर मंगळवार व गुरुवार या काळात अपंग सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र चालविले जाते.
विद्यालयातील व इतरही दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र, शिष्यवृत्ती, शासकीय योजना, नोकरी विवाह इ. बाबत या केंद्रात सल्ला व मार्गदर्शन केले जाते.
सन २०१६ पासून टेक महिंद्र फाउंडेशनतर्फे मंडळाला शाळेसाठी भरघोस अर्थसहाय्य मिळत आहे. मंडळ फाउंडेशनचे ऋणी आहे.
आजी-माजी मुख्याध्यापिका
एका ध्येयाने प्रेरित होऊन श्रीमती अनघा करंदीकर ह्या मूकबधिर मुलांसाठी १९७२ पासून विद्यादानाचं कार्य करत होत्या. तिथून सुरु झालेली अध्यापनाची परंपरा निरंतर आजतागायत सुरु आहे. ज्यांनी ह्या विद्यामंदिरासाठी विद्यादानासह व्यवस्थापकीय आणि निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली त्यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे.
श्रीमती अनघा करंदीकर
(कार्यकाळ: जून १९७२ ते मे १९८२)
श्रीमती सुमन सहस्त्रबुद्धे
(कार्यकाळ: जून १९८२ ते नोव्हेंबर १९८८)
श्रीमती सुधा सिधये
(कार्यकाळ: डिसेंबर १९८८ ते नोव्हेंबर १९८९)
श्रीमती शामा जोग
(कार्यकाळ: डिसेंबर १९८९ ते एप्रिल १९९७)
श्रीमती साधना सप्रे
(कार्यकाळ: मे १९९७ पासून विद्यमान)
सांस्कृतिक उपक्रम
शैक्षणिक शिबिरं
शालेय-आंतरशालेय स्पर्धा
ज्येष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले ह्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेले शुभेच्छापत्र भेट देण्यात आले
ऐतिहासिक क्षण
भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांचे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तो क्षण
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)